ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारताची प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेल्लाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रत्युषा गरिमेल्लाचा तिच्या राहत्या घरी संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रत्युषा तेलंगणातील बंजारा हिल्स येथे राहत होती. बेडरुममध्ये प्रत्युषा मृतावस्थेत सापडली. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फॅशन डिझायनर प्रत्युषाचा मृत्यू झाला आहे. प्रत्युषाचा मृतदेह तिच्या घरातील बेडरुममध्ये संशयास्पदरित्या आढळून आला. प्रत्युषा घरात असताना तिच्या घराबाहेरील सुरक्षा रक्षकांनी काही कामानिमित्त दरवाज्याची अनेकदा बेल वाजवली. पण प्रत्युषाने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रत्युषाला बराचवेळा आवाज दिला पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पोलिसांनी तिच्या घराचा दरवाजा तोडला आणि घरामध्ये प्रवेश केला. पोलिसांनी तिच्या घरामध्ये शोधाशोध केली असता प्रत्युषा मृतावस्थेत आवढळून आली.