ताजी बातमी ऑनलाईन टीम
२७ एचपी वरील यंत्रमागधारकांच्या वीज बिलातील पोकळ थकबाकी भरावी अन्यथा वीज जोडणी कट करण्याचा इशारा महावितरण कंपनीने यंत्रमागधारकांना दिला आहे. या विरोधात यंत्रमागधारक संघटनांच्यावतीने महावितरणच्या कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना सोमवारी दोन तास घेरावो घातला. पोकळ थकबाकी रद्द न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शासनाने २७ एचपी वरील यंत्रमागधारकांना वीज सवलत सुरू ठेवली आहे. २७ एचपी वरील यंत्रमागधारकांची २ महिन्याची पोकळ थकबाकी रद्द करावी असे आदेश दिले असतानाही केवळ राज्य सरकारकडून सबसिडीची रक्कम मिळाली नाही या कारणास्तव यंत्रमागधारकांच्या वीजबिलातील पोकळ थकबाकी रक्कम वसुल करण्यासाठी यंत्रमागधारकांना नोटीस बजावली आहे. वीजवितरण कंपनीची पोकळ थकबाकी वसुलीची चाललेली ही धडपड यंत्रमागधारक कदापिही सहन करणार नाही, असा इशारा देत आज जागृती यंत्रमागधारक संघटना तसेच एअरजेट लूम ओनर्स असो.च्या वतीने महावितरणचे कार्यकारी अभियंत्यांना घेरावो घालण्यात आला.
पोकळ थकबाकीसाठी यंत्रमागधारकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्यास अथवा वीज कनेक्शन कट करणेची कोणत्याही प्रकारची कार्यवाही महावितरणकडून झाल्यास यंत्रमागधारकांकडून तो हाणून पाडला जाईल.
वस्त्रोद्योग मंत्री आणि वस्त्रोद्योग आयुक्त यांच्या आदेशाने महावितरण वीज सवलत रद्द करू शकते तर त्यांच्याच आदेशाने पोकळ थकबाकी रद्द का करू शकत नाही, याचा सारासार विचार करून पोकळ थकबाकी बाबतीत महावितरणने योग्य ते आदेश देऊन नोटीसा मागे घ्याव्यात, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यंत्रमागधारक संघटनांच्यावतीने विनय महाजन व राजगोंडा पाटील यांनी दिला आहे.