आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवारासाठी काँग्रेस आग्रही आहे. जिथे जिथे पक्षाचे सरकार आहे, तिथे काँग्रेसने आपल्या मित्रपक्षांना शरद पवारांना (Sharad Pawar) आपला पाठिंबा असल्याचे कळवले आहे. यासंदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पक्षप्रमुख सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा संदेश घेऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास काँग्रेस त्यांना पूर्ण पाठिंबा देत असल्याचे दिसत आह. दरम्यान ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी 15 जून रोजी विरोधी पक्षांची बैठक (Opposition Parties Meeting) बोलावली आहे. त्याच दिवशी शरद पवार समविचारी पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. मात्र या चर्चांवर शरद पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सत्ताधारी पक्षाचे समीकरण शरद पवार बिघडवू शकतात कारण त्यांना इतर लहान पक्षांचा पाठिंबा मिळू शकतो. आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इतर विरोधी नेत्यांशी संपर्क साधला आहे. त्यांनी विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांशी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात संवाद साधला आहे.
काँग्रेसने एका निवेदनात “काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शरद पवार, ममता बॅनर्जी आणि इतर काही विरोधी नेत्यांशी आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे. कोविड-19 मुळे खराब झालेली तब्येत लक्षात घेऊन त्यांनी इतर विरोधी नेत्यांशी केलेल्या चर्चेनुसार LOP मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यांच्यासोबत समन्वय साधण्यासाठी नियुक्ती केली आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे की राज्यघटना, लोकशाही संस्था आणि नागरिकांचे सत्ताधारी भाजपच्या हल्ल्यापासून संरक्षण करू शकेल अशा राष्ट्रपतीची देशाला गरज आहे असे काँग्रेसचे मत आहे. पक्षाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विशिष्ट नाव सुचवले नसले तरी ही लोकांसाठी राष्ट्रपतीपदाची अशी निवडणूक असेल, जी भारताची “सामाजिक जडणघडण” दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे.
काँग्रेसने एका निवेदनात म्हटले की “आपल्या देशाच्या आणि येथील लोकांच्या फायद्यासाठी आपल्या मतभेदांच्या वरती जाण्याची वेळ आली आहे. चर्चा आणि विचार-विनिमय खुल्या विचारांनी आणि या भावनेला अनुरूप असायला हवा. आम्हाला असे वाटते की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने इतर पक्षांसोबत मिळून ही चर्चा पुढे न्यायला हवी”. दुसरीकडे भाजपने आपले पक्षप्रमुख जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर विविध राजकीय पक्षांशी चर्चा करण्याची आणि त्यांना एकमतावर आणण्याची जबाबदारी सोपवली आहे.