Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : कसबा वाळवे येथे विजेच्या धक्क्याने वेल्डरचा मृत्यू

कोल्हापूर : कसबा वाळवे येथे विजेच्या धक्क्याने वेल्डरचा मृत्यू

कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथे शेडच्या वेल्डिंगचे काम करत आसताना विजेचा धक्का लागून वेल्डरचा मृत्यू झाला. पांडुरंग आबा फराक्टे (वय ४३) असे वेल्डरचे नाव आहे.

कसबा वाळवे येथे पांडुरंग फराक्टे यांनी वेल्डिंग व अन्य लोखंडी कामे करुन देण्यासाठी गॅरेज टाकले आहे. याबरोबरच घराच्या, शेडच्या, छताच्या कामांसह सर्व प्रकारची वेल्डींगची कामे ज्या त्या ठिकाणी जाऊन ते करतात. आज सकाळी कसबा वाळवे पैकी संकपाळवाडी येथील कागल पाणंद नावाच्या शेतामध्ये ते चव्हाण कुटुंबियांच्या शेडचे काम करत होते. अचानक त्यांच्या हातातील पाईपचा स्पर्श वरून जाणाऱ्या ११ हजार व्होलटेजच्या विद्युत वाहिनी झाला. यात त्यांना जोराचा धक्का लागून ते खाली फेकले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. लोकांनी त्यांना तत्काळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूरच्या शासकीय रूग्णालयात नेण्यात आला.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून उदरनिर्वाह करणारा कष्टाळू, मनमिळावू पांडुरंगच्या अचानक जाण्याने गावातील मित्र, नातेवाईक व ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत होते. कुटुंबियांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, १३ वर्षाचा मुलगा आणि १५ वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

याबाबत येथील महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता कनिष्ठ अभियंता सागर धोंगडे म्हणाले की, शेडच्या वेल्डिंगचे काम करण्यासाठी लाईन बंद करण्याबाबत संबंधितांनी कोणतीही मागणी केलेली नव्हती. ही लाईन ११ हजार केव्हीची आहे. दुर्घटना घडली सकाळी ८.४५ वाजता आणि लाईन चालू झाली ८.५५ वाजता. मग हा अपघात कसा घडला ? हे उत्तरीय अहवालात समजेल.

एक वर्षापूर्वी अशाच प्रकारे छतावरील सोलरचे काम करताना ऋतुराज पाटील या तरुणाचा तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला होता. पांडुरंगच्या अपघाती मृत्यूने ही आठवण ताजी होताना अशी कामे करताना खबरदारी घेतली पाहिजे, अशी चर्चा उपस्थितांत होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -