तासगाव – विटा रस्त्यावरील वंजारवाडी हद्दीतील दोस्ती धाब्यावर एका वेटरने दुसऱ्या वेटरचा चाकूने गळा चिरून खून केला. हणमंत श्रीरंग पिसाळ (रा, बावधन ता ,वाई) असे मृत्यू झालेल्या वेटरचे नाव आहे तर या प्रकरणी सुशांत बजरंग जगताप (रा, बस्तवडे ता, तासगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवार रात्री हा प्रकार घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तासगाव-विटा रस्त्यावर वंजारवाडी हद्दीत दोस्ती ढाबा आहे. येथे जगताप व पिसाळ हे दोघेही वेटर म्हणून काम करीत होते. शुक्रवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यातून जगताप याने पिसाळ याचा चाकूने गळा चिरला.
गंभीर जखमी अवस्थेत हणमंत पिसाळ याला सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पिसाळ याचा मृत्यू झाला. जगताप याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे करीत आहेत.