देशामध्ये प्लास्टिक बंदीसाठी (Plastic Ban) सरकारकडून (Central Government) बऱ्याच वेळा पाऊलं उचलली जात आहेत. पण अजूनही प्लास्टिकचा वापर केला जात आहे. अशामध्ये केंद्र सरकारने देशात सिंगल यूज प्लास्टिकविरोधात (Single Use Plastic) कृती आराखडा (Action Plan) तयार केला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी कठोर नियम केले आहेत. सीपीसीबीने स्पष्टपणे सांगितले आहे की, 1 जुलैपासून जर कोणी सिंगल-युज प्लास्टिक विकले किंवा या प्लास्टिकचा वापर करत असाल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
1 जुलैपासून सिंगल यूज प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. सीपीसीबीने 1 जुलैपासून पूर्णपणे बंदी असलेल्या सिंगल यूज प्लास्टिकची यादी देखील जारी केली आहे. या सर्व उत्पादनांना पर्याय म्हणून 200 कंपन्या उत्पादने तयार करत आहेत. यासाठी त्यांना परवान्याचे नूतनीकरण करण्याची गरज नाही.
1 जुलैपासून खालील प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी –
– प्लास्टिकच्या स्टिकवाले ईयर बड्स
– फुग्याची प्लास्टिकची काठी
– प्लास्टिकचे ध्वज
– कँडी स्टिक
– आइस्क्रीम स्टिक
– थर्माकोल
– प्लास्टिक प्लेट्स
– प्लास्टिक कप
– प्लास्टिक पॅकिंग साहित्य
– प्लास्टिकचे बनलेले आमंत्रण पत्रिका
– सिगारेटची पाकिटे
– प्लास्टिक आणि पीव्हीसी बॅनर (100 मायक्रॉनपेक्षा कमी)
प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई –
सीपीसीबीने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोणत्याही दुकानात एकेरी वापराचे प्लास्टिक वापरल्यास त्या दुकानाचा व्यापार परवाना रद्द केला जाईल. पुन्हा परवाना मिळविण्यासाठी दुकानदाराला दंड भरून पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे सर्व दुकानदारांनी आताच सावध होत सिंगल प्लास्टिकचा वापर करणे थांबवावे.