ताजी बातमी ऑनलाईन टीम
आसाममधील पूरस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या पुरात मागील २४ तासात ७ जणांच्या मृत्यूमुळे एकूण मृतांची संख्या ही १०८ वर पोहचली आहे. आसाममधील पुरस्थिती पाहता राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी पुरग्रस्त जिल्ह्यांचा पाहणी दौरा केला. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या बुलेटिननुसार, पुरामुळे बाधित लोकांची संख्या कमी झाली आहे. यात ३० जिल्ह्यांतील ४५.३४ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे, तर बुधवारी ३२ जिल्ह्यांतील पूरग्रस्तांची संख्या५४.५ लाख होती.
आसाममध्ये पूरपरिस्थिती अद्यापही बिकट आहे. या संकटाचा ४५ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना तडाखा बसला असून गेल्या २४ तासांत आणखी सात जणांचा मृत्यू झाला. आता बळींची संख्या १०८ झाली आहे. ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांचे पाणी शुक्रवारी ओसरत असले तरी त्यांच्या उपनद्या अद्यापही तुडूंब वाहत आहेत, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
आसाममधील पूर परिस्थितीवर केंद्र सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि आव्हानाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य सरकारसोबत काम करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान म्हणाले, पूरग्रस्त भागात लष्कर आणि एनडीआरएफचे पथक उपस्थित आहेत. ते बचावकार्य करत आहेत आणि बाधित लोकांना मदत करत आहेत. IAF ने बचाव कार्याचा एक भाग म्हणून २५० हून अधिक उड्डाणे केली आहेत.