ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई; शिवसेनेचे बंडखोर आमदार व मंत्री एकनाथ शिंदे तसेच त्यांच्या सोबत असणाऱ्या बंडखोर आमदारांसाठीचे परतीचे दरवाजे बंद झाले आहेत. आम्ही त्यांना सन्मानाने परत येण्यास सांगितले; पण त्यांनी परतीचा मार्ग स्वीकारला नाही. आमच्या संपर्कात २१ आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आपले बहुमत सिद्ध करेल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबतची चर्चा आता संपली आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही बंडखोर आमदारांनी व एकनाथ शिंदे यांच्याशी वारंवार चर्चा करुन परत येण्याची विनंती केली होती. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील मोठे नेते आहेत. त्यांनी परत यावे हे सर्वच शिवसैनिकांना इच्छा आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्तीश: त्यांना परत येण्याबद्दल विनंती केली. सर्वांना वाटत होतं की, ते सर्व आमदार परत येतील काल पर्यंत त्यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडे होते; पण, आता एकनाथ शिंदे यांच्यासाठी आमचे दरवाजे बंद झाले आहेत. त्यांच्या सोबतची चर्चा आता संपल्याचे राऊत यावेळी म्हणाले.