ताजी बातमी ऑनलाईन टीम
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंद यांनी बंड पुरकारत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप केला. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत शिवसेना आणि अपक्ष असे एकूण 46 बंडखोर आमदार शिंदे गटात सहभागी झाले. या आमदारांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्र सरकार पडण्याची भीती निर्माण झाली आहे. सरकार पडू नये यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. अशामध्ये शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर आक्रमक भूमिका घेत आमदारांवर सडकून टीका केली आहे. ‘महाराष्ट्रात बंड करण्याची हिंमत नाही त्यामुळे ते बाहेर पळाले.’, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी सांताक्रुझ येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना बंडखोर आमदरांवर जोरदार टीका केली आहे. ‘तुमची लायकी असती तर सुरतमध्ये पळाला असता? बंड ठाण्यात बसून मुंबईत बसून केलं असतं. पण महाराष्ट्रात बंड करायची हिंमत नाही म्हणून बाहेर पळाले. लोकांचे प्रेम दिसत आहे. पर्यायवरण मंत्री म्हणून माझं हेच काम होते राज्यात कुठेही घाण साचू नये आणि ती घाण गेलेली आहे. याचा मला आनंद आहे.’, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
‘बंडखोर आमदारांनी हिंमत असेल, तर आज महाराष्ट्रात यावs आणि राजीनामा देऊन निवडणूक लढवावी. त्या प्रत्येक आमदाराला मी पाडणार.’ असे परखड मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. तसंच, ‘मला काल एका मित्राचा फोन आला. तो म्हणाला की, आदित्य तुम्हाला आता लढा द्यायचा आहे. गद्दार आमदार कधी ना कधी महाराष्ट्रात येणार आहेत. मी म्हटलं बरोबर आहे. त्यावर तो म्हणाला तुमचं आडनाव काही दिवस ठोकरे करा. मी म्हटलं ठोकरे नाही, ठोकरेपेक्षाही ठाकरे हे नाव अधिक शक्तीशाली आहे.’, असे त्यांनी सांगितले.




