ताजी बातमी ऑनलाईन टीम
शिवसेनेच्या बंडाळीने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने आता राजकीय नाही तर कायदेशीर लढाई सुरू केली आहे. शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यांना सोमवारी ५.३० वाजेपर्यंत बाजू मांडण्यास मुदत देण्यात आली आहे. तसेच विधासभा उपाध्यक्षांकडे कारवाईचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत पत्रकारांना माहिती देताना अॅड. देवदत्त कामत यांनी सांगितले की, जोपर्यंत शिंदे गट विलीन होत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. शिंदे गटाकडे बहुमत असले, तरीही बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. सोमवारपासून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यास सुरूवात होणार आहे. पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून आमदारांवर कारवाई करण्याचा पक्षाला अधिकार आहे. कारवाई होऊ द्यायाची नसेल, तर गट एखाद्या पक्षात विलिन करणे हाच एकमेव पर्याय आता शिंदे गटाकडे आहे.
दरम्यान, जे दूर गेले त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे’, असे सांगणारे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हेही आता कव्हरेज क्षेत्राबाहेर आहेत. त्यामुळे मतदारसंघातील आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित ठेवणारे उदय सामंत हे गुवाहाटीला रवाना झाले असल्याचे समजते. ते एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्याने रत्नागिरीतील शिवसैनिकांच्या मनात चलबिचल निर्माण झाली आहे. उद्य सामंत सुरतमार्गे चार्टर्ड प्लेनने गुवाहाटीला रवाना झाले असल्याचे समजत आहे.