रत्नागिरी-नागपूर महामार्गावर लक्ष्मीनगर येथे झालेल्या अपघातात शीतल बाबासो जत्ते (वय 47, रा. मालगाव, ता. मिरज) हे ठार झाले. याप्रकरणी संतोष चारुदत्त जत्ते यांनी सुशांत रावसाहेब तारदाळे उर्फ पिंटू पुजारी (रा. मालगाव) यांच्या विरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत शीतल जत्ते आणि सुशांत तारदाळे हे दोघे मोटारसायकलवरून शनिवारी गावी निघाले होते. सुशांत तारदाळे हा मोटारसायकल चालवीत होता, तर शीतल जत्ते हे पाठीमागे बसले होते. सुशांत तारदाळे हा (एमएच 10 सीई 4292) ही मोटारसायकल भरधाव वेगाने चालविता होता. यामुळे त्याचा मोटारसायकलवरील ताबा सुटला.
डोक्याला, पाठीला, तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने शीतल जत्ते यांचा मृत्यू झाला. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने मोटारसायकल चालवून अपघात करून शीतल जत्ते यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सुशांत तारदाळे याच्यावर मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीतल जत्ते यांची पत्नी मालगाव ग्रामपंचायतीत सदस्य आहेत.
मोटारसायकल राष्ट्रीय मार्गाच्या कामासाठी टाकलेल्या मुरुमाच्या ढिगावर जाऊन आदळली. या अपघातात शीतल जत्ते यांना गंभीर दुखापत झाल्याने ते रक्ताच्या थोराळ्यात पडले. जत्ते यांना तेथेच सोडून सुशांत याने घटनास्थळावरून पळ काढला.