पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून सोलापुरातील सुनील व्हटकर यांना 15 लाखांचा गंडा घालणाऱ्या भोंदूबुवा व त्याच्या साथीदारांकडून मंगळवारी सांगली ग्रामीण पोलिसांनी अडीच लाखांची रोकड जप्त केली. आतापर्यंत त्याच्याकडून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.
भोंदूबुवा रोहित बेन्नाळकर ऊर्फ शंकर महाराज, संदीप पाटील, रोहित ऐवळे व अरुण कोरे या चौघांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. यापूर्वी सांगलीतील बादशहा पाथरवट व त्यांची पत्नी आसमा या दोघांना अटक करण्यात आली होती.
व्हटकर यांच्याकडून घेतलेली 15 लाखांची रोकड भोंदूबुवासह सात जणांनी समान वाटून घेतली होती. चार दिवसांपूर्वी भोंदूबुवासह चौघांच्या अंगझडतीत एक लाख 36 हजारांची रोकड सापडली होती. तसेच त्यांच्या ताब्यातून एक कारही जप्त केली होती. पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यात त्याच्या घरावर छापे टाकले. नातेवाईकांना ताब्यात घेतले. काही रक्कम त्याने नातेवाईकांना दिली होती. ती अडीच लाखांची रक्कम जप्त केली असल्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी सांगितले. आणखी मुद्देमाल जप्त करण्याचे सुरू आहे, असेही गायकवाड म्हणाले.
दरम्यान, भोंदूबुवाच्या टोळीतील शिवानंद शरणाप्पा हाचंगे (60, विडी घरकूल, सोलापूर) हा अजूनही फरारी आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक पुन्हा सोलापूरला रवाना केले आहे, पण अजून तरी त्याचा सुगावा लागलेला नाही.