खर्चाला आळा घालण्यासाठी एस.टी. महामंडळाने सीएनजी, ई-बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर 1 जूनपासून ही ई-बस पुणे ते अहमदनगर या मार्गावर सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर कोल्हापूर ते पुणे मार्गावर ई-बस सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी एस.टी.च्या ताफ्यात लवकरच ईबस दाखल होईल, अशी अपेक्षा आहे.
कोल्हापुरातील एस.टी.च्या विभागीय कार्यालयात इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते. या कामासाठी महावितरणकडून लागणारी मंजुरी घेण्यासह सेंटर उभारणीचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.
एस.टी.च्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने एस.टी. महामंडळाने राज्यासाठी सुमारे 1 हजार ई-बसेस घेण्याचे नियोजन आहे. ग्रीनसेल मोबिलिटी कंपनीतर्फे या बसेस घेण्यात येणार आहेत. यातील ग्रीनसेल मोबिलिटी कंपनीतर्फे एस.टी. महामंडळासाठी 50 बसेस देण्यात येणार आहेत. यातील पहिली ई-बस 1 जूनपासून पुणे-अहमदनगर या मार्गावर सुरू करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर मार्गांवर या इलेक्ट्रिक बस धावणार आहेत.
पुणे ते कोल्हापूर मार्गावर ई-बस सोडण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ताराबाई पार्क येथील एस.टी.च्या विभागीय कार्यशाळेत चार्जिंग सेंटर उभारणीचे काम सुरू होते, यातील 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. महावितरणने यासाठी वीज देण्यासाठी मान्यता दिली आहे. महावितरणकडून ट्रान्स्फॉर्मरची उभारणी सुरू आहे. अन्य काही कामे बाकी आहेत, पुढील आठवड्यात सर्व कामे पूर्ण होतील. यानंतर याची वरिष्ठ कार्यालयाला माहिती देण्यात येईल. जुलै महिन्यात कोल्हापूर ते पुणे मार्गावर ई-बस सुरू होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील बारा आगारांमध्ये 665 बसेस आहेत. यामध्ये ‘शिवशाही’ या खासगी कंपनीकडून घेण्यात आलेल्या 35 बसेस आहेत, तर उर्वरित लाल रंगाच्या साध्या बसेस आहेत. यामध्ये आता ई-बसेस व सीएनजी बसेसची भर पडणार आहे.