इस्लामपूर येथील अल्पवयीन शाळकरी मुलीची वारंवार छेडछाड काढून तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघा तरुणांविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तिघाही संशयितांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दि. 1 जुलैअखेरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सैफ खाटीक (वय 19), मतीन जावेद मणेर (वय 19), जैद मणेर (वय 21 सर्व रा. इस्लामपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी अल्पवयीन मुलगी शाळेला जात असताना रस्त्यावर थांबून हे तरुण तिची वारंवार छेड काढत होते. हा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरू होता.
संशयित सैफ खाटीक याने तिला रस्त्यात अडवून ‘तू माझ्याशी लग्न कर. नाहीतर तुझा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी बदनामी करेन’, अशी धमकी दिली. तसेच तिचा विनयभंग केला. या त्रासाला कंटाळून या मुलीने तिघांविरोधात फिर्याद दिली आहे.