‘आमच्या कंपनीकडे पैसे गुंतवा, पंधरा दिवसांत दुप्पट पैसे परत मिळतील’, या आमिषाने तिघांनी अनेकांना गंडा घातला आहे. यामध्ये मुरगूडच्या एकाची पंधरा लाखांची फसवणूक झाली आहे. त्यासंबधी रेश्मा नदाफ (रा. इचलकरंजी), विजय येटाळे (रा. सरवडे) व योगेश बाळासो राणे (रा. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक झालेल्यांनी तक्रार द्यावी, असे आवाहन मुरगूड पोलिसांनी केले आहे.
याप्रकरणी जॉन्सन जेरोन फर्नाडिस (रा. मुरगूड, ता. कागल) याने फिर्याद दिली आहे. विजय येटाळे याच्याकडे पैसे गुंतवल्यास पंधरा दिवसांत पैसे दुप्पट मिळतात, अशी माहिती सचिन माळी याने फर्नाडिस यांना दिली. त्यानुसार त्यांनी येटाळे याच्याशी संपर्क साधला. दिल्लीच्या युनिक फायनान्स कंपनीकडून दुप्पट पैसे मिळत असल्याचे त्याने सांगितले. या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर रेश्मा नदाफ असल्याचे सांगितले. या दोघांकडे आपण 10 फेब्रुवारी 2022 रोजी 15 लाख रुपये दिले.
पंधरा दिवसांनंतर आपण दुप्पट पैशासंबधी विचारणा केली असता नदाफ यांनी आपणास भोगावती-कोथळी दरम्यान एका लॉजवर बोलावले. तेथे आपल्यासमोर एकास दोन लाखांचे चार लाख दिल्याचे सांगितले व आपलेही पैसे लवकर मिळतील, असे सांगितले. येटाळेने 15 लाखांपैकी 7 लाख त्याने चेकद्वारे परत केले. पण उर्वरित आठ लाख रुपयांबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. राणे याने नदाफ यांच्याकडे पैसे मागितल्यास ‘तुला सोडणार नाही’, अशी फोनवरून धमकी दिली आहे. पोलिस नाईक राम पाडळकर तपास करीत आहेत.
अनेकांना कोट्यवधीचा गंडा?
दुप्पट पैशाच्या आमिषाने अनेकांनी या तोतयांकडे लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. फसवणूक झालेल्यांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिस करीत आहेत.