मुलगा होत नाही म्हणून सासरच्या मंडळीकडून सुनेवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. मात्र, बीड जिल्ह्यातल्या आष्टीमध्ये वंशाच्या दिव्यासाठी आईने तीन मुलांसाठी चक्क सहा सुना करून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सुनेला मुलगा होत नाही म्हणून आपल्या भाच्यासोबत अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार आष्टी तालुक्यामध्ये उघडकीस आला होता. या प्रकरणात आता आणखी एक नवा खुलासा झाला आहे. आपल्या तिन्ही मुलांना मुलगा होत नसल्याने चक्क मुलाच्या आईनेच तीनही मुलांसाठी सहा सुना घरी आणल्याचा प्रकार पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर समोर आला आहे.
आष्टी तालुक्यातला जळगाव येथे भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबात आई वडील आणि तीन मुलं आहेत. तीनही मुलं विवाहित असून यापैकी कोणालाच मुलगा होत नसल्याने सासूने चक्क तिघांसाठीही सहा सुना आणल्या होत्या. एका मुलाच्या पहिल्या पत्नीला मुलगा न झाल्याने तिच्यासोबत काडीमोड घेतला आणि त्या मुलाच दुसरं लग्न लावून दिलं. दुसऱ्याही पत्नीला टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून मुलगीच झाली. त्यामुळे हट्टाला पेटलेल्या सासूने आपल्या 29 वर्षीय सुनेला स्वतःच्या 23 वर्षीय अविवाहित भाच्यासोबत बळजबरीने अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं.
सुनेने विरोध केल्यानंतरही तिला शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करून तिला हा घाणेरडा प्रकार करण्यास सासरच्या मंडळींनी दबाव टाकला. हे सर्व अत्याचार सहन न झाल्याने दोन ऑगस्ट रोजी पीडित सुनेने थेट आष्टी पोलीस ठाणे गाठलं आणि झालेल्या अत्याचाराची माहिती देऊन सासू-सासरा आणि पती व अत्याचार करणाऱ्या तरुणांविरोधात पोलिसात तक्रार दिली.
या सर्व प्रकरणानंतर पोलिसांनी पीडितेचा पती व सासर्याला अटक केली होती. मात्र, त्यांना आता अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. तर या प्रकरणात पीडितेवर अत्याचार करणारा तरुण आणि पीडितेची सासू सध्या फरार आहेत. या आरोपींना तात्काळ अटक आणि शिक्षा न झाल्यास उद्या 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा पीडितेने पोलिसांना दिला आहे.