भिलवडी माळवाडी (ता. पलूस) येथील मेघा योगेश वावरे (वय 29) या महिलेने सासरच्या व पतीच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी घडली. महिलेच्या नातेवाईकांकडून पती योगेश गोविंद वावरे (रा. माळवाडी) याच्या विरोधात भिलवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, पती योगेश याने “नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी चार तोळे सोने अथवा त्या बदल्यात रोख रक्कम हुंडा म्हणून घेऊन ये”, असे म्हणून मेघा हिला माहेरी वारंवार पाठवून देत होता. पैशासाठी मानसिक त्रास देऊन दमदाटी केली जात होती. या त्रासाला कंटाळून मेघा हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी संशयित योगेश याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात उभे केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग करीत आहेत.