अभंग, भजने आणि भक्तीगीतांनी दुमदुमला मार्ग, 25 ते 30 हजार जणांचा सहभाग, खंडोबा तालीमजवळ उभे तर पुईखडीवर गोल रिंगण सोहळा प
हिली शोधोनी अवघी तीर्थे…यासह अनेक अभंगांची बरसात करत आणि गेली दोन वर्षे अंतरलेल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या भेटीची आस घेऊन रविवारी सकाळी कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ या पायी दिंडीचे श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळाचे आयोजन केले. दिंडीत फुलांनी सजवलेल्या रथामध्ये विराजमान चांदीच्या पालखीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची मूर्ती व पादुका अग्रभागी होत्या.
या पादुकांच्या मागे व पुढे कोल्हापूरसह शंभरहून अधिक गावांमधील विणेकरी, भजनी मंडळे, तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला, टाळकरी व मृदुंगधारकांसह 25 ते 30 हजार विठ्ठल भक्तांचा दिंडीत जणू महापूरच उसळला होता. या महापुरात टाळमृदुंगाच्या तालावर हातातील दिंडय़ा पताका लहरताना होय होय वारकरी…पाहे पाहे पंढरी असा गजर करुन दिंडीमार्ग दुमदुमून सोडला. अशा वातावरणातच अभंग, भजनांसह वरुणराजाच्या साक्षीने पुईखडीवर रिंगण सोहळा झाला.