राज्यामध्ये सध्या जोरदार राजकीय घडामोडी सुरु आहेत. शिवसेनेतून बंड पुकारत एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी झालेल्या आमदारांवर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून वारंवार निशाणा साधताना दिसत आहेत. आदित्य ठाकरे या आमदारांना सतत आव्हान देताना दिसत आहेत. ‘थोडी जरी लाज, हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवा, असे आव्हान त्यांनी आज बंडखोर आमदारांना दिले आहे. आज आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेअंतर्गत दहिसर येथे शिवसैनिकांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर (Rebel MLAs) निशाणा साधला. ‘ज्या बंडखोरांना परत यायचंय त्यांनी परत यावं, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत.’, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसंच ‘फुटीर गटातही दोन गट आहेत. एक गट असा आहे ज्यांना जबरदस्तीने पळवून नेले आहे, त्यांना परत यायचे आहे आणि दुसरा असा की ज्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा होत्या. मात्र काहींना जबरदस्ती नेलं आहे. थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा’ असे आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे.