जिह्यात पावसाची संततधार सुरू झाली असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र अतिवृष्टी कायम आहे. सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अलमट्टी धरणाच्या साठयात दिवसांत आठ टीएमसीने वाढ झाली आहे. कोयना आणि वारणा धरणांच्या साठ्यातही वेगाने वाढ होत असून कृष्णा ,वारणा नद्यांची पातळीही वाढू लागली आहे. त्यामुळे संभाव्य महापुराची चर्चा आता नदीकाठच्या गावांत सुरू झाली आहे.
रविवारी रात्री आणि सोमवारी महाबळेश्वर, नवजा, कोयना, वारणा परिसरात जोरदार पाऊस होता. सोमवारी दिवसभरात कोयना परिसरात 50, महाबळेश्वर 77 आणि नवजा परिसरात 76 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय अन्य धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार सुरू आहे. मुसळधार सुरूच असल्याने सोमवारी सायंकाळी कोयना धरणातील पाणीसाठा 32.50 तर वारणा धरणातील साठा 18.30 टीएमसी झाला आहे. अलमट्टी धरणाच्य पाणीसाठयात एक दिवसात आठ टीएमसी वाढ होऊन सोमवारी सायंकाळी या धरणातील साठा 83.85 टीएमसी झाला. अलमट्टी धरणातील विसर्ग सोमवारी सायंकाळी 75 हजार करण्यात आला आहे.
अलमट्टीतून विसर्ग वाढवण्यासाठी कर्नाटकवर दबाव वाढवा
कृती समिती सांगली आणि कोल्हापूर या दोन जिह्यातील महापुरास कारणीभूत ठरणारया अलमट्टी धरणाचा साठा हा पाऊसमान वेळेत 512 मीट ठेवण्याचे असताना जास्तीचा साठा करत आहेत. सध्या आजची पाणी पातळी 515.77 व आवक 81,900 क्युसेक आहे. त्यामुळे या धरणातील पातळी एका दिवसात आठ फुटांनी वाढली आहे. वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनुसार 31 ऑगस्टपर्यंत अलमट्टीतील पाण्याची पातळी 512 मीटर ठेवावी या कडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा दोन्ही जिल्हयांत महापुर अटळ असल्याची भिती कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीने व्यक्त केली आहे. यामध्ये लक्ष घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांगली आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी ,दोन्ही जिह्यांचे अधिक्षक अभियंता,तसेच सेंट्रल वॉटर कमिशन पुणे आणि हैद्राबाद यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारवर दबाव आणण्याची मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली.