येत्या विकेंडला वर्षाविहार (Weekend Plan) किंवा पर्यटनाचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Pune Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी पुण्यातील गड-किल्ले आणि इतर पर्यटन क्षेत्रात जमावबंदीचे आदेश काढले आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर (Red Alert) हे आदेश काढण्यात आले आहेत. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून पुढील 48 तासांत आणखी वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.
मुंबई, पुणेसह कोकणात गुरुवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे, विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापुरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
pune जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी काढलेल्या आदेशानुसार, पुणे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात कलम 144 लावण्याचे आदेश दिले. गुरुवार, 14 जुलै 2022 ते रविवार, 17 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत पर्यटक, गिर्यारोहक आणि ट्रेकर्स यांना पर्यटनस्थळावर प्रवेशास बंदी असणार आहे. हवामान विभागाकडून शहर आणि परिसरात पुढील 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये, तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्रास होऊ नये, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
पुढील तीन दिवस शाळांनाही सुट्टी
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून जिल्ह्यातील पहिली ते 12 वी पर्यंतच्या शाळांना पुढील तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेने कंपन्यांना शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम देण्याचे आवाहन केले आहे. पुण्यात पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खबरदारी म्हणून पुणे महापालिकेने खासगी कंपन्या, आयटी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन केले आहे.