कडेगाव तालुक्यातील वांगी येथे अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत चार घरे फोडून पैसे, सोने, टीव्ही, मोबाईल असा एकूण 1 लाख 20 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान, या घटनेने गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत चिंचणी वांगी पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वांगी येथे रविवार रात्री वांगी – रामापूर रस्त्यालगत असलेल्या चव्हाण मळा येथील जगन्नाथ दादू चव्हाण यांच्या घरात अज्ञात चोरटे घुसले. त्यांनी सुमारे 13 हजार रोख व 15 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.
त्यानंतर सचिन रुपाजीराव पाटील याचे बंद घराचे कुलूप तोडून सुमारे 35 हजार रुपये किमतीचा टीव्ही पळविला. बाळासाहेब दादू चव्हाण यांचे बंद घराचे कुलूप तोडून टीव्ही व तांब्याची भांडी असा 20 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
दरम्यान, अंबिका देवीच्या मंदिराच्या मागे असणाऱ्या बंद खोलीचा दरवाजा तोडण्याचा चोरट्यांनी पर्यंत केला. मात्र कुलूप न तुटल्यामुळे तेथील चोरीचा प्रयत्न फसला. मात्र जवळ झोपडीत राहत असणाऱ्या दोन मजुरांचे दोन मोबाईल व रोख रुपये मिळून 20 हजारांचा मुद्देमाल चोरांनी चोरून नेला.