राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट बनवून राज्यात नवं भाजप प्रणित सरकार स्थापन केले. या सत्ता नाट्यात शिंदे गटाचे नायक म्हणून एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर भाजपचे 106 आमदार असतान देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारून आता 13 दिवस उलटले आहे. पण, अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त लागला नाही. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजप आता नवी खेळी खेळणार असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपाने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर दिली आहे. अमित ठाकरे सध्या आमदार किंवा विधान परिषद सदस्य नाहीत. असे असतानाही त्यांना मंत्री करण्याचा निर्णय हा शिवसेनेतील ठाकरे कुटुंबाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न असू शकतो असे राजकीय जाणकारांकडून सांगण्यात येते. मात्र भाजपच्या या ऑफरचा अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
तर दुसरीकडे गेल्या काही वर्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे शिवसेनेची सूत्रे हाती घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशा परिस्थितीत अमित ठाकरेंना मंत्रिमंडळात आणण्याच्या हालचाली या आदित्य ठाकरे यांच्यासाठी थेट आव्हान म्हणून पाहिले जात आहे. सध्या अमित ठाकरे हे मनसे विद्यार्थी सेनेच्या प्रमुखपदी आहेत.
दरम्यान, राज ठाकरे एका मोठ्या शस्त्रक्रियेतून बरे होत असताना अमित ठाकरे आता पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत. सध्या अमित ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यात लवकरच मंत्रीमंडळ स्थापन करणार असल्याचे सांगण्यात येत असून या मंत्रिमंडळात अमित ठाकरेंना मंत्री पद दिले जाते का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.