वातावरणात बदल झाल्यामुळे मिरज शहरात ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अशा रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे लहान मुले असल्याचे निदर्शनास आले आहे. डेंग्यू, हिवताप होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करून नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाची संततधार सुरू आहे.
त्यामुळे हवामानात गारवा निर्माण झाला आहे. हवामान बदलामुळे शहरात अनेकांना ताप येऊ लागला आहे. तापाचे रुग्ण वाढल्याने खासगी रुग्णालयासह महापालिका दवाखाना व शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्यांची गर्दी दिसत आहे. यामध्ये टायफाईडचेही रुग्ण आढळून येत आहेत. काही बालके हे एक-दोन दिवसांत उपचार घेऊन बरे होत आहेत.