धामोड; गवशी (ता.राधानगरी) येथे गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्याने चार विजेचे खांब गावातील एका गल्लीत कोसळले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गवशी येथे सडलेले विजेचे खांब बदलण्यासाठी विज वितरण कंपनीकडे लेखी मागणी करूनही, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. याबद्दल विज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे
गुरुवारी (दि.१४) सायंकाळी पाच वाजता शाळा सुटलेली मुले घरी जात होती. तर डेअरीला दुध घालण्यासाठी महिलांची धावपळ सुरु होती. अशातच मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे गवशी येथील विजेचे चार खांब मोडून खाली पडले. विजप्रवाह सुरु असल्यामुळे जोरात आवाज झाला व विद्युत भारीत तारांचा एकमेकांशी संपर्क होताच स्फोटांच्या आवाजाप्रमाणे आवाज झाला. याप्रसंगी या रस्त्यावरून लहान मुलांसह सुमारे पन्नासहून आधिक नागरीक रस्त्यावरून घरी जात होते. सर्वांनी घाबरून न जाता समयसुचकता दाखवत जेथे आहेत तेथेच थांबले. यानंतर गावातील लोकांनी धावत जाऊन ट्रान्सफार्मरमधून विज पुरवठा बंद केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.