सांगली येथिल महापालिकेच्या प्रभाग पंधरासह अन्य भागात गेल्या आठवडाभरापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. नगरसेवकांनी स्वखर्चातून प्रभागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नगरसेवकांसह नागरिकांमधूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सांगली शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. गेल्या दीड-दोन वर्षात शहरात अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा होतो. याबाबत अनेकवेळा आयुक्तांपासून अधिकाऱ्यांच्यापर्यंत सखोल बैठका झाल्या. मात्र पाणी प्रश्न जैसे थे आहे. आता ऐन पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः धावाधाव करावी लागत आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील रमामातानगर,पटेल गल्लीसह बहुतांशी भागात गेल्या सात दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. या परिसरात मोठ्या संख्येने मुस्लीम समाज राहतो. बकरी ईदच्या दिवशीही या परिसरात नागरिकांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान स्थानिक नगरसेवक फिरोज पठाण यांनी स्वखर्चातून प्रभागात पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे काही अंशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गढूळ, गाळ मिश्रीत पाणी
शहरात अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे. त्यात भरीस भर म्हणून काही भागात गढूळ आणि गाळ मिश्रीत पाणीपुरवठा होत आहे. अनेक ठिकाणी गळती आहे, ती काढली जात नसल्याने पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यास अडथळे येत आहेत. वारंवार तक्रार करुनही दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे.