विशाळगडाच्या पूर्वेकडील चार दगडी बुरुजांच्या उभारणीने शिवकालीन इतिहासाला उजाळा मिळाला. मात्र, बुधवारी ढासळलेल्या एका दगडी बुरुजाच्या घटनेने उर्वरित बुरुजांना धोका निर्माण झाला आहे.
4 कोटी 95 लाखांच्या निधीतून बुरुजाच्या डागडुजीची कामे केली. मात्र, उर्वरित कामासाठी पुरातत्त्व खाते इकडे फिरकलेच नाही. अनेक कामे अर्धवट राहिल्याने पर्यटकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. निधीच शिल्लक नसल्याचा कांगावा पुरातत्त्व खाते करीत असले तरी नेमका निधी कुठे मुरला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्य शासनाने गड, किल्ले संवर्धन मोहिमेंतर्गत विशाळगडासाठी 4 कोटी 95 लाखांचा निधी मंजूर केला. या निधीमधून गडाच्या भिंती, बुरूज, दरवाजे, पाण्याचे साठे, मंदिरांची डागडुजी, पडकी कमान, शिवकालीन विहिरी आदी कामे केली जाणार होती. बुरुज, तटबंदीतील झाडे-झुडपे, गवत काढून तसेच जमिनीखाली गाडलेले दगड उत्खनन करून पूर्वेकडील चार बुरुजांची डागडुजी केली. चारही बुरुजांची सांगड एकमेकांशी आहे. बुधवारी रात्री बुरुज कोसळल्याने डागडुजीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. निकृष्ट
कामाचा फटका या शिवकालीन ठेव्याला बसला आहे. कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.