Monday, July 7, 2025
Homeसांगलीसांगली : महापालिका क्षेत्रात रस्त्यांची दैना

सांगली : महापालिका क्षेत्रात रस्त्यांची दैना

सांगली शहर सौंदीकरणासाठी महापालिकेची दमदार पावले पडत असताना पावसाने महापालिका क्षेत्राचे वेगळेच स्वरूप समोर आणले आहे. पावसाने सर्वत्र रस्ते राडेराड झाले आहेत. उपनगरांमधील बऱ्याचा रस्त्यांची अवस्था तर अतिशय दयनीय आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक, नागरिक सारेच बेजार झाले आहेत. नागरिकांमध्ये उद्रेकाची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुरुमाची आणि पावसाळ्यानंतर रस्ते कामांची मोहीम सुरू करावी लागणार आहे. त्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणावा लागणार आहे.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे क्षेत्रफळ 118.18 चौरस कि.मी. आहे. महापालिकेचे क्षेत्र तुलनेने मोठे आहे. विस्तारीत भाग नागरी वस्तीने विस्तारत आहे. रस्ते, पाणी, गटारी या मुलभूत सुविधा आवश्यक आहेत. मात्र तुलनेने या सुविधांसाठी निधी अतिशय अपुरा मिळत आहे. मिळत असलेला निधी वेळेत उपलब्ध होत नाही. कामे वेळेत सुरू होत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे या सेवा-सुविधांचा पुरता बोजवारा उडत आहे.

शहर, उपनगरांमधील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. मुख्य रस्ते बऱ्यापैकी सुस्थितीत असले तरी अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. महापालिका क्षेत्रात डांबरी रस्त्यांची एकूण लांबी 440 कि.मी., काँक्रीट रस्त्यांची लांबी 57 कि.मी., खडी रस्त्याची लांबी 75 कि.मी., तर कच्च्या (मुरूम मातीच्या) रस्त्यांची लांबी 70 कि.मी. इतकी आहे. कच्चे रस्ते हे प्रामुख्याने विस्तारीत भागातील आहेत. हे रस्ते तर पुरते राडेराड झाले आहेत. या रस्त्यावरून चालणे अशक्य आहे, तिथे वाहनांची अवस्था काय असेल? खडी, डांबरीचे रस्ते खड्ड्यांनी भरले आहेत. खड्ड्यांची समस्या केवळ विस्तारीत भागातच नव्हे, तर शहरांमध्येही आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणचे नागरिक वैतागले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -