ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : गेल्या दोन दशकांतील तब्बल चार वेळेला बुडिताचा कटू अनुभव कोल्हापूरकरांच्या पाठीशी असूनही नव्या बुडिताला सामोरे जाताना परिस्थितीमध्ये कोणताही मूलभूत फरक झालेला नाही. यामुळे चार दिवसांत पंचगंगेची पातळी वाढून पुराच्या पाण्याने शहर आणि परिसरातील भूभाग आपल्या वेढ्यामध्ये घेतला, तर कोल्हापूर शहराला पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्यापैकी अवघ्या 30 टक्के पाण्याचाच उपसा होऊ शकतो. शिवाय राज्य शासनाने कमालीची उदासीनता दाखविल्यामुळे कोल्हापूरकरांना अंधाराचा लपंडावही अनुभवावा लागणार आहे.
कोल्हापूरकरांनी गेल्या दोन दशकात 2005, 2009, 2019 आणि 2021 असा चार वेळेला महापुराच्या आपत्तीशी सामना केला आहे. ही आपत्ती दिवसेंदिवस अधिक भीषण होताना दिसते आहे. गेल्या दोन महापुरात तर जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी घुसून जिल्हाधिकाऱ्यांची टेबल-खुर्ची महापुरात तरंगत होती. शहरात दुधाळी, नागाळा पार्क, बापट कॅम्प ही वीज मंडळाची सबस्टेशन्स पाण्यात गेल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले.
शिवाय शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा, शिंगणापूर, कसबा बावडा या ठिकाणी बसविण्यात आलेल्या पाणी उपसा आणि वितरणाच्या यंत्रणा पाण्यात गेल्यामुळे 15 दिवस शहराचा पाणीपुरवठाही ठप्प झाला होता.
या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात विजेच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्याचे कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव तयार करण्यात आले. राज्यकर्त्यांनी शहराला आपत्तीतून सोडविण्याची खंडीभर आश्वासने दिली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक कोल्हापुरात येऊन पाहणी करून गेले आणि निमलष्करी दलाच्या जवानांच्या तुकड्या पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी दीर्घकाळ वास्तव्याला राहिल्या. या सर्वांतून कोल्हापूरकरांना सुटकेची आशा होती.