कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी बंडखोर शिवसेना शिंदे गटासोबत जाण्याचा घेतलेला निर्णय धक्कादायक मानला जात आहे. मंडलिकांना ६ तालुक्यांतील मतदारांनी मतदान केले असताना राजकीय निर्णय घेताना या तालुक्यांना विचारात घेतले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मतासाठी ६ तालुक्यातील कार्यकर्ते आणि राजकीय निर्णय मात्र, कागल तालुक्यातील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन, हा विचार सामान्य कार्यकर्त्यांना रुचलेला नाही.
राज्यासह जिल्ह्यात नव्हे, तर गावागावांमध्ये शिवसेनेच्या बंडखोरीचे लोण पसरत आहे. सेनेच्या विद्यमान आमदारांसह खासदारांनीसुध्दा शिंदे गटाला पाठबळ दिले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे सेनेचे खासदार संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी ‘आमचं ठरलयं’ ही टॅगलाईन पुढे आली होती. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी धनंजय महाडिकांना पराभूत करण्यासाठी राजकीय सर्वस्व पणाला लावत मंडलिकांना मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले होते. विशेषत: काँग्रेससह राष्ट्रवादीच्या छुप्या मदतीचाही यामध्ये समावेश होता.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरलेल्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिकांचा ३३५४२ मतांनी पराभव केला होता. तर २०१९ मध्ये मात्र सतेज पाटील यांच्यामुळे घड्याळाचे काटे उलटे फिरले आणि शिवसेनेचे संजय मंडलिक मताधिक्याने विजयी झाले.
विजयी मंडलिकांना ७ लाख ४९ हजार ८५ तर पराभूत महाडिकांना ४ लाख ७८ हजार ५१७ मते मिळाली. मंडलिकांना चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कोल्हापूर उत्तर या विधासभा मतदारसंघातून अनपेक्षितपणे मतदान झाले. म्हणजेच कागल तालुक्यापेक्षा अन्य विधानसभा मतदार संघातून मताधिक्य मिळाले, हे नाकारता येत नाही. मग असे असताना खासदार मंडलिक यांनी शिंदे गटाला पाठिंबा देताना या सहाही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना विचारात घेणे गरजेचे होते. परंतु शिंदे गटाशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेताना कागल तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करुन का घेतला? मताला ६ तालुके आणि राजकीय निर्णय घेताना कागल तालुका हे सर्वसामान्यांना न सुटणारे कोडे आहे.
Sanjay Mandlik : मताधिक्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचा मोठा वाट
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या मंडलिकांचा ३३५४२ मतांनी पराभव केला होता, पण त्याच मंडलिकांना २०१९ मध्ये २ लाख ७० हजार ५६८ मताधिक्य मिळाले होते. या मताधिक्यामध्ये नाराज काँग्रेस, राष्ट्रवादीचाच मोठा हातभार होता, हे विसरुन चालणार नाही.