ताजी बातमी ऑनलाईन टीम
येथील काशीद गल्लीतील एका घरात शॉर्टसर्किट ने लागलेल्या आगीत दोन लाखाचे नुकसान झाले. पन्हाळा नगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी व शेजारच्या लोकांनी तातडीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केल्याने अनर्थ टाळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पन्हाळा येथील काशीद गल्लीत भाड्याने मधुकर वसंत महापूरे राहतात. आज सकाळी अचानक त्यांच्या घरातील विजेचे वायरिंग जळू लागल्याचे लक्षात आले. त्यानंतर घरातील महापुरे कुटुंबातील लोकांनी आरडाओरडा करत घरातून बाहेर धाव घेतली. त्याच वेळी घरातील टीव्हीमध्ये स्फोट होऊन आग भडकली. दरम्यान, गल्लीतील लोक मदतीला आले, पाणी मारून आग विझविण्यासाठी प्रयत्न (assay) सुरू केले.
दरम्यान पन्हाळा पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र आगीत महापुरे यांचे सर्व प्रापंचिक साहित्य, मुलांचे शालेय कागदपत्रे, रोख रक्कम, दागिने, जळून खाक झाले. तलाठी वैभव कोळी यांनी पंचनामा केला.