सैन्य भरती होत नसल्याने अनेक युवकांवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे. ही भरती त्वरित होण्यासाठी सातार्यात मंगळवारी युवकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. कॉम्रेड्स सोशल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन झाले. यावेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलकांशी चर्चा केली.
सैन्य भरतीबाबत शासन अथवा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे युवकांनी लोकशाही मार्गाने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. मंगळवारी सकाळपासून युवक मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले होते. त्यांनी आंदोलनास सुरूवात केल्यानंतर खा. उदयनराजे आंदोलनस्थळी आले होते. त्यांनी आंदोलकांशी मागण्यांसंदर्भात चर्चा केली.
कोरोना काळात भारतीय सैन्य दल भरती स्थगित झाल्याने उमेदवारांचे वय वाढले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांना भारतीय सैन्य दलाच्या भरती करता असलेल्या वयोमर्यादेच्या नियमावलीत तात्पुरत्या कालावधीकरता शिथीलता देवून वयोमर्यादा किमान दोन वर्षे वाढवून द्यावी.
भारतीय सैन्य दल इच्छुक उमेदवारांच्यावतीने राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्याशी समन्वय साधून मागण्यावर त्वरित निर्णय घेण्यात यावा. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशाराही जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जयवंत उथळे, अमोल साठे, बासित चौधरी, रणजित भिसे व युवक उपस्थित होते.
तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील : खा. उदयनराजे
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी भेट देवून त्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली.यावेळी पत्रकारांशी बोलताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले,अतिरिक्त जिल्हाधिकार्यांशी चर्चा करून विषय समजावून घेतला आहे.
सैन्य भरतीसंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या हातामध्ये काही नाही. तुमच्या मागण्यांचे निवेदन सदन कंमाड किंवा भरती प्रकियेशी संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचवण्याचे जिल्हा प्रशासन करेल. या तुमच्या अडचणी फक्त तुमच्यापुरत्या मर्यादीत नाहीत त्यासाठी दोन वर्षापूर्वीच तुम्ही मला का भेटला नाही. याप्रश्नी आता लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही खा. उदयनराजेंनी दिली.