ताजी बातमी ऑनलाईन टीम
मिरज; येथील ब्राह्मणपुरी परिसरात विना परवाना सुरू असलेले हॉटेल महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी सील केले. ही कारवाई सुरू असताना हॉटेलच्या मालक वेदिका सोमदे यांच्या सासू पुष्पा सोमदे या बेशुद्ध पडल्याने गोंधळ निर्माण झाला.
ब्राम्हणपुरी येथे असणाऱ्या शाळा क्रमांक एकजवळ ओम शिव स्नॅक सेंटर या नावाचे हॉटेल आहे. त्या हॉटेलसाठी हॉटेल मालकांनी महापालिकेचा परवाना घेतला नाही. परवाना नसताना त्यांनी हॉटेल सुरू केले. याबाबत एका महिलेने महापालिकेच्या लोकशाही दिनात तक्रार केली होती. त्यामुळे आयुक्त नितीन कापडणीस यांनी हे हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले होते. ते हॉटेल महापालिका आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सील केले. त्या हॉटेलसमोर उभे करण्यात आलेले हातगाडेही ताब्यात घेण्यात आले.
मात्र हॉटेल मालकांनी हॉकर्सचा परवाना दाखविल्यानंतर हातगाडे त्यांना परत देण्यात आले. ही कारवाई सुरू असताना सोमदे यांच्या सासू तेथे आल्या. ही कारवाई बघून त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना त्वरित उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे कारवाई सुरू असताना गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, हॉटेल मालक वेदिका सोमदे म्हणाल्या, आमच्या हॉटेलवर करण्यात आलेली ही कारवाई चुकीची आहे. या अन्यायाबाबत आम्ही दाद मागू.