जत तालुक्यातील डफळापुर येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन(ATM ) फोडण्याचा चोरट्यांचा डाव शनिवार ता ३० जुलै रोजी पहाटेच्या सुमारास फसला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवून दोघा संशयितांना ताब्यात घेतले होते. मात्र या चोरी प्रकरणात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा पोलीस कॉन्स्टेबलच मुख्य आरोपी असल्याचे उघड झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सचिन कोळेकर असे या पोलिसाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोळेकरसह त्याचा साथीदार सुहास शिवशरण याला अटक केली आहे.
कवठेमहांकाळ जत या मार्गावरील डफळापूर गावात बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम सेंटर(ATM ) आहे. शनिवारी ३० जुलै रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी एटीएममध्ये प्रवेश करीत एटीएम मधून फोडाफोडी करून मशीनमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. एटीएम मधून पैसे निघत नसल्याने एटीएम मशिनसह पोबारा करण्याचे नियोजन चोरट्यानी आखले. एटीएम मशीन बाजूला त्या गाळ्यातून काढून बाहेर आणली मात्र मशीन उचलता न आल्याने रस्त्यातच मशीन फेकून चोरटे पळून गेले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगवान केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला माहिती मिळाली की, या चोरीमध्ये थेट पोलीस गुंतला आहे. कॉन्स्टेबल मुख्य आरोपी असल्याची कुणकुण लागताच पोलिसही चक्रावले.
कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सचिन कोळेकर हा नाईट राऊंड साठी कार्यरत होता. कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथे चोरट्यांनी हवेत गोळीबार करून एटीएम मशीन(ATM ) लंपास केले होते. त्याच प्रकारची चोरी आपणही करायची अशी सुपीक कल्पना त्याच्या डोक्यात आली. शनिवारी रात्री त्याने एक बोलेरो गाडी भाड्याने आणली. त्याच्या एका साथीदाराला सोबत घेऊन डफळापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम सेंटर ज्या ठिकाणी होते त्याठिकाणी बोलेरोला रस्सी बांधून तीच रस्सी त्याने एटीएम मशीनला बांधली आणि गाडीने ओडून ते मशीन जोरात बाहेर ओढले.
मशीन हे एटीएम सेंटर मधून बाहेर पडल्यानंतर कोळेकर आणि त्याच्या साथीदाराने ते उचलण्याचा प्रयत्न केला मात्र मशीन जड असल्याने त्यांना ते शक्य झाले नाही. अर्धातास झटल्यानंतर पहाटे होत असतानाच त्यांनी एटीएम मशीन तेथेच टाकून पोबारा केला. या एटीएम मशीन मध्ये तब्बल ३० लाखांची रोकड असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.