कोल्हापूर : मतदार यादीला आधार कार्ड जोडले जाणार आहे. जिल्ह्यात सोमवार, दि. 1 ऑगस्टपासून ही मोहीम सुरू झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ज्यांना आधार कार्ड जोडायचे नाही अथवा ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, अशा मतदारांना निवडणूक आयोगाने सांगितलेल्या 11 पैकी एक ओळखपत्र जोडावे लागणार आहे.
मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे, निवडणूक आयोगाकडून देण्यात येणारी माहिती प्रत्येक मतदारांपर्यंत मोबाईलच्या माध्यमातून पोहोचावी, यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्याची ही विशेष मोहीम आहे. दि. 31 मार्च 2023 पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. नवीन मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी यापूर्वी वर्षातून 1 जानेवारी हा एकच अर्हता दिनांक होता. आता 1 जानेवारीसह 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर हे तीन दिवसदेखील अर्हता दिनांक जाहीर केले आहेत.