ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : पावसाच्या सरी अंगावर झेलत पीऽऽऽ ढबाक्च्या सुरात शहरातील विविध तालीम, मंडळांचे पंजे भेटीसाठी बाहेर पडले. नेत्रदीपक विद्युत रोषणाईसह साऊंड सिस्टीमचा दणदणाट रविवारी रात्री अनुभवायला मिळाला. शहराच्या सर्वच भागांतील मानाचे पंजे रविवारी भेटीसाठी निघाले होते. बाबूजमाल तालीम, घुडणपीर दर्गा, बाराईमाम, भवानी मंडप परिसरात रात्री उशिरापर्यंत पंजे भेटीचा सोहळा पाहायला भाविकांची गर्दी होती.
मोहरमच्या सातव्या दिवशी शहरातील अनेक पंजे भेटीसाठी बाहेर पडले होते.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत पंजे भेटीचा सोहळा होऊ शकला नव्हता. रविवारी सायंकाळपासूनच बिंदू चौक, शिवाजी रोड, शिवाजी चौक, गुजरी, ताराबाई रोड, महाद्वार रोड, पापाची तिकटी या मार्गांवर पंजे भेटीसाठी निघाल्याचे दिसून आले. खाटिक चौकातील लाड बंधूंचा ख्वाजा गरीब नवाज, तवकलशा भक्त तरुण मंडळ, सोमवार पेठ यांचा नाल्याहैदर पंजा, राजारामपुरीतील झिमझिमसाहेब पंजा, शाहूपुरी स्टेशन रोडवरील ताडे बंधूंचा चाँदसाहेब पंजा, वाळव्याची स्वारी पंजा 69 वर्षांनी भेटीस निघाला होता. या पंजांच्या मिरवणुकांना मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होती. बाबूजमाल तालीम, घुडणपीर दर्गा, वाळव्याची स्वारी याठिकाणी भाविक दर्शनासाठी येत होते.