मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. कोयना, चांदोली धरण परिसरात मध्यम पाऊस सुरु आहे. यामुळे धरणांतील पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. परिणामी कृष्णा, वारणा नद्यांची पाणी पातळी कमी झाली आहे. यामुळे नदीकाठाने नि:श्वास टाकला आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. मंगळवार, बुधवारी पश्चिम भागात तुरळक पाऊस पडला. पूर्वभागात केवळ ढगाळ वातावरण होते. शिवारात मात्र पाणी साचले आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात (मंगळवारी सकाळी 8 ते बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत) सरासरी 0.2 मिमी पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 14.5 मिमी पाऊस पडला.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात एक जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे:
मिरज :1.5 (307.2), जत : 0.1 (271), खानापूरविटा : 1.1 (358.3), वाळवा-इस्लामपूर : 8.1 (461.2), तासगाव: 2.0 (308.6), शिराळा : 14.5 (946.2), आटपाडी : 0.2 (217.1), कवठेमहांकाळ : 0.3 (392.9), पलूस : 3.3 (274.4), कडेगाव : 3.3 (361.4).
धरण परिसरात सुरु असणारा प्रचंड पाऊस काहीप्रमाणात कमी झाला आहे. गेल्या 24 तासात म्हणजे मंगळवारी सकाळी आठ ते बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 53 मिमी पाऊस पडला. याप्रमाणेच नवजाला 57, महाबळेश्वरला 94 मिमी पाऊस पडला. बुधवारी दिवसभरात हलका पाऊस पडला. कोयना धरणातून विसर्ग कमी केला आहे. परिणामी कृष्णा नदीचे वाढलेले पाणी हळूहळू कमी होऊ लागले आहे.
वारणा नदीचे पात्राबाहेर पडलेले पाणी कमी होऊ लागले आहे. पाणी कमी होऊ लागल्याने नदीकाठच्या गावांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
विविध धरणांतील विसर्ग
कोयना :21,399, धोम: 3021, कण्हेर : 547, चांदोली: 3154, दुधगंगा : 3650, राधानगरी: 3028, धोम बलकवडी: 1290, उरमोडी : 2933, तारळी: 1671 व अलमट्टी धरणातून 1 लाख 25 हजार क्यूसेक विसर्ग सुरु आहे.
विविध धरणांतील पाणीसाठा (क्षमता कंसात टीएमसीत)
कोयना: 96.75(105.25), धोम: 12.48 (13.50), कण्हेर: 8.86 (10.10), चांदोली : 30.85 (34.40), दूधगंगा : 22.81 (25.40), राधानगरी : 8.30 (8.36), तुळशी: 3.36 (3.47), कासारी : 2.65 (2.77), पाटगाव : 3.50 (3.72), धोम बलकवडी : 3.73 (4.08), उरमोडी: 9.34 (9.97), तारळी : 5.31 (5.85), अलमट्टी: 110.67 (123).
विविध पुलाच्या ठिकाणी पाणीपातळी
कृष्णा पूल (कराड) : 14.11, बहे : 9, भिलवडी : 25.10, आयर्विन पूल (सांगली) : 23.9, अंकली पूल (हरिपूर) : 30.5.