इंगळी (ता. हातकणगंले) येथून देवदर्शनासाठी एका कुटुंबाच्या चार चाकी गाडीचा मुंडगुड ( जि.कारवार, कर्नाटक राज्य ) नजीक भीषण अपघात झाला. यामध्ये एक महिला जागीच ठार झाली. रुपाली विद्यासागर गुदले असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघाताने इंगळी गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबतची समजलेली माहिती अशी, इंगळी येथे विद्यासागर गुदले आपल्या कुटुंबासह राहत असून, ते जिल्ह्यातील एका साखर कारखान्यात नोकरी करीत आहे. त्यांनी काही दिवसापूर्वी चार चाकी गाडी खरेदी केली आहे. या गाडीमधून ते त्यांची पत्नी, मुलगा आणि नातेवाईक असे मिळून कर्नाटक राज्यातील हुमच्या येथील पद्मावती देवीच्या दर्शनासाठी जात होते. यावेळी त्यांची गाडी मुंडगुड (जि.कारवार, कर्नाटक राज्य ) नजीकच्या एका वळणवर पलटी झाली.
यावेळी गाडीचा दरवाजा निखळला गेल्याने दरवाजाशेजारी बसलेल्या रुपाली गुदले हि महिला गाडीतून बाहेर फेकल्या जावून झाडावर जावून आदळल्या. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारा करीता नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यु झाला. तर गाडीतील अन्य व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत. या अपघाताने इंगळी गावावर शोककळा पसरली आहे.