सांगली शहरातील गणेश मंडळांसाठी सोमवारपासून ऑनलाइन पद्धतीने परवानगी प्रक्रिया सुरू केली जात आहे. गणेश मंडळांनी ऑनलाइन लिंकचा वापर करून रीतसर परवानगी घ्यावी. याचबरोबर सर्व मंडळांनी आणि नागरिकांनी यंदाचा उत्सव हरित आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महापालिकेत आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त राहुल रोकडे यांनी नियोजन बैठक घेतली. बैठकीस उपायुक्त चंद्रकांत आडके, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांच्यासह सर्व विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी, स्वछता निरीक्षक उपस्थित होते.
उपायुक्त रोकडे म्हणाले, ‘सर्व मंडळांनी आणि नागरिकांनी यंदा हरित आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी इको-फ्रेंडली उत्सवाबाबत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी यामध्ये सहभागी व्हावे. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे नियोजन सुरू असून, अनेक ठिकाणचे खड्डे बुजविण्यात आले आहेत. गणेशमूर्ती दान करणाऱ्यांना प्रमाणपत्रे दिली जाणार असून, निर्माल्य कुंडातच टाकावे. मनपा क्षेत्रात फिरत्या विसर्जन कुंडांची संख्या वाढविण्यात येणार असून, पर्यावरणपूरक उत्सवासाठी जनजागृतिवर विशेष भर देण्यात येणार आहे. गणेशोत्सव मंडळाच्या आजूबाजूला स्वच्छतेच्या सूचना दिल्या आहेत. उत्सवकाळात सार्वजनिक स्वच्छतागृहे दररोज दोन वेळा स्वच्छ करण्यासह आवश्यक ठिकाणी तात्पुरते शौचालय बसविण्यात येणार आहे.
विसर्जनस्थळी मनपा क्षेत्रात पाच वैद्यकीय पथके
रुग्णवाहिकेसह सज्ज करण्यात येणार आहेत. तसेच निर्माल्य नदीत पडू नये यासाठी निर्माल्यकुंडांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. उपनगरात कृत्रिम विसर्जनतळी उभारण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. दोन दिवसांत नगरसेवक, तसेच सामाजिक संस्था यांची बैठक घेऊन उत्सवाचे अंतिम नियोजन करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त रोकडे यांनी स्पष्ट केले.