ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)सुमारे दीड महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. विराट बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. जवळपास अडीच वर्षांपासून त्याने एकही शतक (century) झळकावलेले नाही. बराच वेळ बायो बबलमध्ये राहिल्याने त्याला मानसिक थकवा जाणवत होता, पण आता तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फ्रेश होऊन या ब्रेकनंतर मैदानात परतणार आहे. या पुनरागमनापूर्वी त्याने सांगितले की, आता तो मागे वळून पाहणार नाही. त्याने बॅटींगमध्ये केलेल्या चुका सुधारल्या आहेत.
शॉट सिलेक्शनवर केले काम
विराट कोहलीने स्वीकार केले की, इंग्लंड दौऱ्यात त्याने चांगली कामगिरी केली नाही, त्यानंतर त्याने त्याच्या शॉट सिलेक्शनवर काम केले आणि त्यात अनेक सुधारणा केल्या. जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यात शेवटचा खेळ केल्यानंतर कोहलीने एका महिन्याहून अधिक काळ क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. यादरम्यान तो वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्याचा भाग नव्हता. पण आता तो आशिया कपमधून टी-20 फॉरमॅटमधून भारतीय संघात पुनरागमन करत आहे.