अकोल्यातून (Akola)एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. पोलीस (Police)होणार या जिद्दीने दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या तरुणीचा धावण्याचा सराव करतानाच अचानक मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस, सैनिक आणि इतर भरतींसाठी तरुण-तरुणी धावण्याचा सराव करत असल्याचे दिसतात. यावेळी ते कवायत करताना आपण नेहमीच पाहतो. मात्र अशाचप्रकारे मैदानात धावण्याची कवायत करत असताना एका 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. पोलीस भरतीची (Police bharti) तयारी करत असलेली तरुणी अचानक कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.
पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे
अकोला शहरातील वसंत देसाई स्टेडियम येथील मैदानावर ग्रामी भागातील अनेक तरुण-तरुणी पोलीस भरतीची तसेच लष्करी भरतीच्या तयारीच्या सरावासाठी येत असतात. पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून 22 वर्षीय रोशनी अनिल वानखडे ही देखील धावण्याचा सराव करत होती. मात्र धावत असतानाचा अचान कोसळून तरुणीचा मृत्यू झाला आहे. ही तरुणी अकोला तालुक्यातील धोतर्डी येथील रहिवासी आहे. रोशनी गेल्या काही दिवसांपासून बहिणीकडे अकोला शहरामध्ये राहत होती. तसेच गेल्या काही महिन्यांपासून ती पोलीस भरतीची तयारी देखील करत होती. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
अचानक कोसळली जमिनीवर
रोशनी बुधवारी (24 ऑगस्ट) साडेचार वाजता धावण्याचा सराव करत होती. सराव करत असतानाच ती अचानक जमिनीवर कोसळली. यावेळी तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणी तिला शुद्धित आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ती प्रतिसाद देत नव्हती. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या पश्चात आई, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.
आठ वर्षांपूर्वी झाले आहे वडिलांचे निधन
रोशनीच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वीच निधन झाले होते. शेतात काम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न झालेले आहे. ती मोठ्या बहिणीसोबतच अकोल्यामध्ये राहत होती. इथेच ती पोलीस भरतीचा सराव देखील करत होती. रोशनीसोबत तिचा भाऊ देखील अकोल्यात पोलीस व आर्मी भरतीचा सराव करत होता. ही दोन्ही भावंडे रोज या मैदानात सरावासाठी यायची. मात्र अचानक रोशनीचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.