ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर- कोरोनानंतर मोठ्या उत्साहात गणेश सोहळा संपन्न होत आहे. कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश तरुण मंडळांनी सहकार्याची भूमिका घेत नियमांचे पालन करावे. शासनाच्या नियमानुसार सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत साउंड सिस्टीमचा ठोका रात्री बारा वाजताच बंद केला जाईल, अशी ठाम भूमिका कोल्हापूर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी घेतली आहे. आज शाहू स्मारक भवन येथे सार्वजनिक तरुण मंडळाच्या सोबत बैठक पार पडली, यावेळी त्यांनी भूमिका मांडली आहे.
सार्वजनिक गणेश विसर्जन सोहळा यंदा नऊ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. कोरोना काळानंतर निर्बंध उठल्याने यंदा अपेक्षा पेक्षा जास्त गणेश भक्तांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज सार्वजनिक गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत शाहू स्मारक भवन येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर डीवायएसपी मंगेश चव्हाण यांच्यासह अन्य पोलीस अधिक उपस्थित होते.
यंदा सार्वजनिक गणेश तरुण मंडळाच्या मागणीनुसार विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाला पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. ज्यांना लवकर गणेश विसर्जन करायचे आहे, त्यांनी सावित्रीबाई फुले हॉस्पिटल-हॉकी स्टेडियम-संभाजीनगर-इराणी खण असा विसर्जन मार्ग स्वीकारावा. ज्यांना पारंपारिक विसर्जन मार्गावर मिरवणूक न्यायची असल्यास त्यांनी वेळेचे नियम पाळून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. तसेच गणेश विसर्जन दिवशी अवजड वाहतूक वळवण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आलं.