ताजी बातमी ऑनलाईन टीम
मिरजेतील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आज जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. दत्ता लक्ष्मण ढवारे ( वय 30 रा. ढोकी जि. उस्मानाबाद) असे सदर आरोपीचे नाव असून विशेष जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी ही शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले.याबाबत आधीक माहिती अशी की, सदरील आरोपी दत्ता ढवारे हा मूळचा ढोकी जि. उस्मानाबाद येथील रहिवासी असून तो काही कामासाठी सांगलीत आला होता.
यावेळी अल्पवयीन मुलीशी त्याची ओळख झाली. ढवारे याने अल्पवयीन मुलीच्या भोळेपणाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केले. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर मिरजेत राहणाऱ्या तिच्या पालकांना हा सारा प्रकार लक्षात आला. पीडित मुलीने सुद्धा आरोपीने आपल्यावर बलात्कार केल्याचे सांगत सारी हकीकत सांगितली. यानंतर पीडित मुलीच्या आईने महात्मा गांधी चौकी पोलिसात याबाबत फिर्याद नोंद केली होती. पोलीस अधिकारी सुनीता साळुंखे यांनी या प्रकरणाचा खोल तपास करीत आरोपीस अटक केली. तदनंतर पीडित मुलीचा कायदेशीर गर्भपात करण्यात आला. साक्षीदारांचे जबाब नोंदवत आरोपीविरोधात सबळ पुरावे मिळवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. पीडिता, कुटुंबियांचा जबाब आणि वैद्यकीय पुरावा ग्राह्य धरण्यात आला. तसेच न्यायवैज्ञानिक यांचा अहवाल विचारात घेवून ही शिक्षा सुनावण्यात आली. पैरवी कक्षातील उपनिरीक्षक शरद राडे, अंमलदार रमा डांगे, वंदना मिसाळ, दीपा सूर्यवंशी, गणेश वाघ, अमोल पाटील, प्रल्हाद खोत यांनी सरकार पक्षाला मदत केली.