रुपया घसरला की डॉलरचं मुल्य वाढलं? हा प्रश्न कायम असताना आज रुपयात पुन्हा एकदा ऐतिहासिक घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 61 पैशांनी घसरण झाली आहे.रुपया 83.01 रुपये प्रति डॉलरवर बंद झाला, जो आतापर्यंतचा नीचांक आहे.
रुपया 83 च्या पुढे गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी मंगळवारीही रुपयामध्ये घसरण दिसून आली. डॉलरच्या तुलनेत तो 82.36 रुपये प्रति डॉलरवर बंद झाला. बुधवारी दुपारच्या व्यवहारात रुपयामध्ये थोडी सुधारणा दिसून आली. मात्र त्यानंतर त्यात घसरण सुरू झाली आणि व्यवहाराच्या शेवटी तो डॉलरच्या तुलनेत 83 रुपये पार गेला. रुपयाच्या घसरणीचे सर्वसामान्यांवर काय परिणाम (Inflation) होणार यावर एक नजर टाकूया.
रुपयाच्या घसरणीचे अर्थव्यवस्थेवर चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम होतात. जेव्हा रुपयाची घसरण होते तेव्हा निर्यातदारांचा फायदा होता. मात्र भारतात निर्यातीपेक्षा आयात जास्त असल्याने फायद्यापेक्षा तोटाच जास्त होतो. (अर्थ विषयक बातम्या)
इंधनाच्या किमती वाढणार?
भारत कच्चे तेल आयात करणारा मोठा देश आहे. त्यामुळे येत्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढू शकतात. इंधन दरवाढीचा परिणाम इतर वस्तूंवर होण्याची शक्यता आहे. रुपयाच्या घसरणीमुळे आयात केलेल्या मालाच्या बदल्यात अधिक भारतीय चलन द्यावे लागणार आहे. त्यामुळे त्या वस्तू किंवा वस्तूची किंमत वाढेल.
रुपयाच्या घसरणीमुळे EMI वाढणार?
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे बाजारात महागाई वाढते. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रेपो दर वाढवण्याच्या धोरणाचा अवलंब आरबीआय करते. रेपो दर वाढला तुमच्या कर्जाचा EMI वाढतो. म्हणजेच तुमच्या कर्जाच्या बदल्यात दिलेल्या EMI साठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील.
वैद्यकीय खर्च वाढणार
भारत मोठ्या प्रमाणात औषधांची निर्यात करतो. सोबत औषध निर्मितीसाठीच्या यंत्रसामुग्री देखील भारत निर्यात करतो. यासाठी जर जास्तीचे पैसे मोजावे लागले तर याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे आणि वैद्यकीय खर्चासाठी नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागू शकतात.
परदेशातील शिक्षण महागणार?
भारतातून परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने जास्त पैसे मोजावे लागू शकतात. याशिवाय विदेशात फिरायला जाण्याचा कुणी विचार करत असेल तो खर्चही आता वाढणार आहे.