ताजी बातमी ऑनलाईन टीम
ड्रग्ज प्रकरणी मुंबई एनसीबीने (NCB) कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या विरोधात 200 पानी चार्टशीट दाखल केली आहे. लवकरच या दोघांविरुद्ध कोर्टात खटला सुरू होणार आहे. 2020 मध्ये एनसीबीने भारती सिंग आणि तिच्या पतीच्या प्रोडक्शन हाऊसच्या कार्यालयावर आणि निवासस्थानावर छापा टाकून 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला होता, त्यानंतर या जोडप्याला अटक करण्यात आली होती. सध्या हे दोघेही जामिनावर बाहेर आहेत.
एनसीबीने जब्त केले होते ड्रग्ज
21 नोव्हेंबर 2020 मध्ये भारती सिंगने मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांसमोर दावा केला होता की, तिने तिच्या पतीने विकत घेतलेला गांजाचे सेवन केले होते. एनसीबीने असेही म्हटले होते की, या जोडप्याच्या वर्सोवा येथील घरी शोध मोहिमेदरम्यान त्यांना 65 ग्रॅम गांजा आणि 21.5 ग्रॅम भांग असलेली बॅग सापडली होती. त्यानंतर या जोडप्याला अटक करण्यात आली होती.
भारती सिंहच्या वकिलांनी केला होता हा युक्तिवाद
त्यानंतर दोघांनाही मजिस्ट्रेट कोर्टात हजर केले असता त्यांना 4 डिसेंबर 2020 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर अयाज खान आणि झाहरा चरनिया या दोघांच्याही वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करत भारती सिंग आणि तिच्या पतीकडे कथित अंमली पदार्थांचे प्रमाण खूपच कमी असल्याचे सांगितले. असा युक्तिवाद देखील करण्यात आला की, वसुलीचे प्रमाण खूपच कमी असल्याने तो अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यांतर्गत जामीनपात्र गुन्हा ठरतो. विशेष म्हणजे, नंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने प्रत्येकी 15,000 रुपये जमा केल्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.