Saturday, February 24, 2024
Homenewsकास पठारचा रंगीबेरंगी नजराणा पर्यटकांना खुला होणार! प्रवेशासाठी 'ही' आहे नियमावली

कास पठारचा रंगीबेरंगी नजराणा पर्यटकांना खुला होणार! प्रवेशासाठी ‘ही’ आहे नियमावली


जागतिक वारसा स्थळ असणार्या कास पुष्प पठारावरील हंगामाची सुरुवात दि. २५ ऑगस्टपासून करण्याचा निर्णय कास पठार कार्यकारी समिती व वनविभाग जावली – सातारा यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
कास पठार येथे आयोजित बैठकीला सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, जावली वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी, सातारा वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण, वनरक्षक नीलेश रजपूत, वनरक्षक स्नेहल शिंगारे, सर्व समिती सदस्य उपस्थित होते.
कास पठारावर विविध रानफुलांचा रंगोत्सव सध्या सुरू झाला आहे. विविध फुलांच्या कळ्या उमलल्या असून पठार विविध फुलांनी बहरणार आहे. त्यामुळे हा फुलोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांना कधी खुला होणार याबाबत उत्सुकता होती.
महाबळेश्वर – पाचगणी खुले झाल्याने कास लवकर खुले व्हावे, अशी अपेक्षा पर्यटकांमधून व्यक्त केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीबाबत उत्सुकता होती. बैठकीत कोरोना आणि इतर परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत दि. २५ ऑगस्टपासून पर्यटकांसाठी कास पठार खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ऑनलाईन नोंदणीसह इतर अटी घालत पठार खुले करण्यात आले. बैठकीत झालेल्या या निर्णयानंतर पर्यटकांनी आनंद व्यक्त केला आहे. मोठ्या कालावधीनंतर कासवरील फुले नागरिकांना पहावयास मिळणार आहेत.
ऑगस्ट- ऑक्टोबर महिन्यात रानफुलांना येतो बहर
कास पठारावर पावसाळा सुरू झाला की विविध रंगी फुलांच्या प्रजाती अंकुरू लागतात. हळूहळू रंगीबेरंगी फुलांचा बहर वाढत जात असतो. ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यात रानफुलांचा बहर मोठ्या प्रमाणात येत असतो. ही रानफुले विविध प्रकारची रंगीबेरंगी असतात.
हिरव्यागार गालिच्यावर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली, वार्याची झूळुक आणि डोलणारी पांढरी विविधरंगी फुले अक्षरश: मन मोहून टाकत असतात. हेच मनमोहक दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी दि. २५ ऑगस्टनंतर पर्यटकांची पावले पठारवर गर्दी करतील.
दरम्यान, कास पर्यटन हंगामासाठी एकूण १२० कर्मचारी घेण्याचे ठरले असून प्रत्येक गावातून तीन महिला कर्मचारी घेण्याचे देखील बैठकीत निश्चित करण्यात आले. तिकीट दर पाच वर्षांवरील सर्वांसाठी व जेष्ठ नागरिकांसाठी १०० रुपये असणार आहे.
शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना तिकिटात सवलत हवी असल्यास वनविभागाच्या परवानगी शिवाय सवलत दिली जाणार नाही. ऑनलाईन बुकिंग करून आलेल्या पर्यटकांनाच फुले पाहता येणार आहेत. ऑफलाईन येणार्या पर्यटकांना फुले पाहण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक दिवशी फक्त तीन हजार पर्यटकांनाच पठारावर प्रवेश दिला जाणार आहे.
समितीमार्फत कायमस्वरूपी पर्यटनासाठी एक मिनी बस खरेदी करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. यावेळी चिठ्ठी पध्दतीने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी करण्यात आल्या. मारुती विष्णू चिकणे यांची चिठ्ठी पद्धतीने अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून कास गावचे दत्तात्रय सीताराम किर्दत यांची निवड करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -