शिवनेरी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव यांची 4 ऑगस्ट रोजी धारदार शस्त्राने वार करून हत्या झाली होती. या हत्येतील प्रमुख आरोपी असलेला प्रमोद थोरात हा गेल्या साडेतीन महिन्यांपासून फरार होता. गुरुवारी रात्री त्याला जेरबंद करण्यात तासगाव पोलिसांना यश आले. डीबी पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, या हत्येतील प्रमुख आरोपी असलेला युवक राष्ट्रवादीचा माजी शहर अध्यक्ष कमलेश तांबेकर व अक्षय पाटील हे दोघेही अद्याप फरार आहे.ढवळवेस येथील शिवनेरी चौकात अनिल जाधव यांची धारदार शस्त्राने पाठीमागून वार करून त्या झाली होती.
4 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेतील अनेक आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. मात्र या हत्येतील प्रमुख आरोपी असलेले कमलेश तांबेकर, प्रमोद थोरात व अक्षय पाटील हे तिघेही गेल्या साडेतीन महिन्यांपासून फरारी आहेत. हे आरोपी परागंदा असल्याचे सांगत पोलिसांनी याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले आहे.दरम्यान गुरुवारी रात्री प्रमोद थोरात हा एका ठिकाणी असल्याची माहिती तासगावच्या डीबी पथकाला मिळाली. या पथकाने थोरात यांच्या मुसक्या आवळून त्याला तासगाव पोलीस ठाण्यात आणले. सुमारे साडेतीन महिन्यानंतर त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असलेले कमलेश तांबेकर व अक्षय पाटील हे दोन्हीही आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणात प्रमुख आरोपींना पकडण्यात तासगाव पोलिसांना लवकर यश न आल्याने शिवनेरी मंडळामध्ये कमालीचा असंतोष आहे. या आरोपींना अटक करण्यासाठी तासगाव बंद, रास्ता रोको यासह पोलीस ठाण्यावर मशाल मोर्चाही काढण्यात आला होता. दरम्यान आता प्रमोद थोरात याला आज न्यायालयासमोर हजर केले जाईल. मात्र या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असलेले कमलेश तांबेकर व अक्षय पाटील यांच्या मुसक्या कधी आवळणार, असा सवाल जाधव कुटुंबीयांकडून केला जात आहे.






