राज्यात अचानक थंडीचा जोर ओसरल्याचं दिसत आहे. बहुतांश जिल्ह्यात थंडीचा पारा घसरला असून, काहीसा उकाडा जाणवत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थंडीचा जोर कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
डिसेंबरमध्ये गारठा वाढणार
राज्यात डिसेंबर महिन्याची सुरुवात ढगाळ वातावरणाने होऊ शकते. 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत राज्यातील वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे, मात्र त्यानंतर राज्यात कडाक्याच्या थंडीची लाट येऊ शकते.
राज्यात 18 नोव्हेंबरपासून गारठा चांगलाच वाढला होता. नाशिक, पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात किमान तापमान 10 अंशाच्या खाली गेले होते. विशेषत, जळगावमध्ये सलग 8 दिवस तापमान 10 अंशांखाली होते.
महाराष्ट्रात थंडी कमी झाली असली, तरी उर्वरित राज्यात गारठा कायम आहे. दिल्ली, मध्य प्रदेश, बिहारमध्ये थंडीने कहर केला आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. मध्य प्रदेशात कोल्ड वेब अलर्ट जारी केला आहे.