Saturday, December 21, 2024
Homeआरोग्यविषयकढोकळा कधी फुलतच नाही? परफेक्ट-लुसलुशीत ढोकळ्यासाठी खास टिप्स

ढोकळा कधी फुलतच नाही? परफेक्ट-लुसलुशीत ढोकळ्यासाठी खास टिप्स

ढोकळा म्हणजे हेल्दी आणि पोटभरीचा पदार्थ. बेसन पीठापासून, मूगाच्या पीठापासून किंवा रवा, तांदळापासून हा ढोकळा केला जातो. पण बेसनाचा ढोकळा जास्त प्रमाणात खाल्ला जातो. घरी ढोकळा करायचा म्हणजे त्याचे गणित परफेक्ट जमायला हवे.

नाहीतर कधी हा ढोकळा एकदम दाटल्यासारखा होतो तर कधी कच्चट राहतो. नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून, जेवणात साईड डीश म्हणून केला जाणारा ढोकळा घरी परफेक्ट जमावा यासाठी नेमकं काय करायला हवं? याबाबतच प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर आपल्या चाहत्यांसोबत काही खास टिप्स शेअर करतात. कुणाल कपूर यांचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स असून त्यांनी सांगितलेल्या रेसिपी, कुकींग टिप्स असंख्य जण फॉलो करतात. नुकतीच त्यांनी ढोकळा परफेक्ट कसा करावा याबाबत माहिती दिली असून ते काय सांगतात पाहूया.

१. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ढोकळा करताना आपण जे बेसन घेतो ते चाळणीने चांगले चाळून घ्यायला हवे. त्यामुळे ढोकळा सॉफ्ट व्हायला मदत होते.

२. ढोकळ्यामध्ये आपण पाणी घालून ते पीठ चांगले एकजीव करतो. पण तसे करताना हे पीठ एकाच बाजुने हलवायला हवे. जर आपण दोन्ही बाजुने पीठ ढवळले तर ढोकळ्याचा लुसलुशीतपणा कमी होतो. एकाच बाजुने फिरवल्यास ढोकळा मऊ होण्यास मदत होते.

३. ढोकळा करताना तो हलका व्हावा यासाठी आपण त्यामध्ये खायचा सोडा किंवा इनो घालतो. हा घातल्यानंतर पीठ हलवून ३० सेकंदांसाठी तसेच ठेवावे. मग ढोकळ्याच्या भांड्यात घालावे. तसेच पीठ घातल्यानंतर भांडे जोरजोरात हलवू नये.

४. हळद जास्त घातली तर ढोकळा छान पिवळाधमक होईल असा आपला समज असतो. त्यामुळे आपण या पीठात नेहमीपेक्षा थोडी जास्त हळद घालतो. मात्र जास्त हळद घातल्यास त्याचा रंग बदलून तो लालसर होतो आणि ढोकळा दाटल्यासारखा होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे हळद चिमूटभरच घालायला हवी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -