मुंबईतील वन अविघ्न इमारतीच्या 35व्या मजल्याला आग लागल्यानं खळबळ उडाली आहे. आगीचे प्रचंड लोट येत असल्याचं घबराट पसरली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. गेल्या वर्षी याच इमारतीला भीषण आग लागली होती. वर्षभरानंतर आता पुन्हा एकदा याच इमारतीत आगीची दुर्घटना घडल्यानं हाहाकार माजलाय.
आज सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी ही आग लागली असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. ही लेव्हल-1 ची आग असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, दुसऱ्यांदा इमारतीत आग भडकल्यानं रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
लोअर परळ येथील भारत माता सिनेमा जवळ असलेल्या महादेव पालव मार्ग येथे वन अविघ्न पार्क ही इमारत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे.गेल्या वर्षीदेखील वन अविघ्न इमारतीला मोठी आग लागली लागली होती. या आगीने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, वर्षभरानं पुन्हा एकदा वन अविघ्न इमारतीला नेमकी आग कशामुळे लागली? या आगीचं नेमकं कारण काय? असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत.
तूर्तास या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. अद्यापतरी या आगीत कुणीही जखमी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. मात्र या आगीमुळे इमारतीतील इतर घरांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.